नवी दिल्ली - नरेंद्र मोदी यांच्या नवनियुक्त मंत्रीमंडळाची बैठक आज दिल्लीत आयोजीत करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या या पहिल्या बैठकीत आगामी काळातील कॅबिनेट समित्या, संसदीय समीत्या या विषयी निर्णय घेतले जातील. शिवाय मंत्री परिषद आणि खातेवाटप विषयांवरही निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती आहे.
राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ५८ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. तर अमित शाह, कैलाश चौधरी, स्मृती इराणी, पियुष गोयल यांच्यासह २४ केंद्रीय मंत्री आणि ३३ केंद्रीय राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली.
मोदींच्या नवीन मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्र्यांपैकी राजनाथ सिंह, राम विलास पासवान, डी वी सदानंद गौडा, नरेन्द्र सिंह तोमर, रविशंकर प्रसाद, हरसिमरत कौर बादल, थावरचंद गहलोत, हर्षवर्धन, पीयूष गोयल, धर्मेन्द्र प्रधान, मुख्तार अब्बास नकवी आदी नेत्यांना कायम ठेवण्यात आले. तर उमा भारती, सुष्मा स्वराज, अरुण जेटली, राधामोहन सिंह, सुरेश प्रभू, मेनका गांधी, राज्यवर्धनसिंह राठोड या मोदींच्या पहिल्या सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांना डावलण्यात आले आहे.
केंद्रीय राज्यमंत्रीपदासाठी गिरिराज सिंह, राजकुमार सिंह, हरदीप सिंह पुरी, कुमार गंगवार, श्रीपद येसो नायक, जितेन्द्र सिंह, किरेन रिजिजू, मनसुख मंडाविया, अर्जुन राम मेघवाल, कृष्णपाल गुर्जर, संजीव कुमार बालियान, पुरुषोत्तम रुपाला, रामदास अठावले, अश्विनी कुमार चौबे, साध्वी निरंजन ज्योति, गजेन्द्र सिंह शेखावत, संतोष आणि बाबुल सुप्रियो आदी मंत्र्याना दुसरी संधी देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातून नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल, शिवसेनेचे अरविंद सावंत, श्रीपाद नाईक, रावसाहेब दानवे, संजय धोत्रे, रमदास आठवले यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.