नवी दिल्ली - निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना उद्या पहाटे ५.३० वाजता फाशी देण्यात येणार आहे. फाशी देण्याच्या काही तासांपूर्वीच दोषींच्या वकिलांनी पतियाळा न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार याचिका दिल्ली उच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती. ही याचिका दिल्ली न्यायालयाने फेटाळली आहे.
सुनावणी दरम्यान न्यायालयाने दोषींच्या वकिलांना फटकारले. 'सर्वोच्च न्यायालयात ज्या मुद्द्यांवर सुनावणी झाली आहे. त्याच मुद्यांवर आम्ही सुनावणी करणार नाही. गेली अडीच वर्षे तुम्ही काय केले. तुम्हाला राष्ट्रपतीकडे दया याचिका दाखल करता आली नाही. तुमच्याकडे शपथपत्र नाही. तसेच याचिकेत तथ्य नसल्यामुळेच कनिष्ठ न्यायलयाने फाशी थांवबली नाही. न्याय व्यवस्थेसोबत तुम्हाला खेळू देणार नाही, या शब्दात न्यायालयाने दोषींच्या वकिलांना फटकारले.
दरम्यान माध्यमांच्या दबावातून चौघांना फाशी देण्यात येत असल्याचा आरोप दोषींच्या वकिलांनी केला आहे. निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना उद्या पहाटे ५.३० वाजता फाशी देण्यात येणार आहे. कायद्यातील सर्व पळवाटा संपल्यामुळे उद्या दोषींना फाशी होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
डिसेंबर 2012 मध्ये एका 23 वर्षीय तरुणीवर बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुकेश, पवन गुप्ता, विनय कुमार शर्मा आणि अक्षय ठाकूर या दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंहने यापूर्वी 11 मार्च 2013 मध्ये तिहार तुरुंगात आत्महत्या केली होती.