मुंबई - क्रांतीकारी तेलुगु लेखक वरावरा राव यांना मुंबईच्या जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ८१ वर्षाच्या वरावरा राव यांची प्रकृती बिघडल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर नवी मुंबईच्या तळोजा तुरुंगातच उपचार सुरु होते. मात्र, त्यानंतरही त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा न झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले.
पुण्याच्या शनिवार वाड्यात एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेनंतर पुण्यात कोरेगाव भीमा दंगल झाल्याचा आरोप करण्यात आला होता. ही परिषद आयोजित करणाऱ्या अनेकांना एनआयएने अटक केली आहे. त्यामधील तेलुगु कवी वरावरा राव हे एक आहेत. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर तीन दिवस तळोजा तुरुंगात उपचार करण्यात आले. मात्र, त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही. त्यामुळे त्यांना मुंबईच्या भायखळा येथील राज्य सरकारच्या जेजे रुग्णालयात गुरुवारी दाखल करण्यात आले आहे. त्यांना इतर आजार असल्याने त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. त्यांची कोरोना चाचणी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
यापूर्वीच त्यांच्या वकिलांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना जामीन देण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यांचे वकील आर सत्यनारायण यांनी न्यायालयाकडे याचिका दाखल करताना म्हटले होते, की वरवरा राव यांचे वय 80 वर्ष आहे. त्यांना या वयात उच्च रक्तदाब आणि इतर आजार आहेत. तळोजा तुरुंगात सध्या त्यांना मागणी करूनही वेगळ्या बराकीत ठेवण्यात आलेले नाही. त्यामुळे कोरोनासारखा आजार त्यांना होण्याची दाट शक्यता आहे. वरवरा राव यांना श्वसनाचा त्रास असल्याने त्यांच्या जीवाला धोका असल्याचेही त्यांच्या वकिलाने न्यायालयासमोर म्हटले होते.