हैदराबाद - देशभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. कोरोनावरील लसींच्या विकासाबाबत केंद्राने स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे तयार केली पाहिजेत, असे तेलंगाणा मंत्री के.टी.रामा राव यांनी म्हटलं आहे. तसेच संपूर्ण जग प्रथम तयार होणाऱ्या लसीची प्रतीक्षा करत आहे. लसीची उपलब्धता आणि तिचे योग्य वितरण सुनिश्चित करण्यासाठी उद्योगासमवेत सल्लामसलत करून एक मजबूत खरेदी धोरण आखायला हवे, असे त्यांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
भारतात कोरोना लसीच्या परवान्याबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे आवश्यक आहेत. यूएस अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) आणि डब्ल्यूएचओ (जागतिक आरोग्य संघटना) यांनी कोरोना लस विकसित करण्याबाबत आणि कोरोना लसीचा परवाने देण्याच्या प्रक्रियेविषयी मार्गदर्शक तत्त्वे आधीच प्रकाशित केली आहेत, असे ते म्हणाले.
कोरोनावरील लसीसाठी भारतामध्ये मार्गदर्शक तत्त्वे आवश्यक आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांमुळे व्यक्तिनिष्ठता दूर होईल. भारतीय लसी उत्पादकांना सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी भारत सरकारने मार्गदर्शक तत्त्वे लवकरात तयार करावीत, अशी विनंती राव यांनी पत्रात केली आहे.