हैदराबाद - तेलंगाणामधील पोलीस आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पूर्ण पगारासह प्रोत्साहनपर रोख रक्कमही देण्यात येणार आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी ते स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत. त्यांच्या याच कामाचे कौतुक म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे राज्य सरकारने सांगितले.
राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी बुधवारी रात्री एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. याबाबतची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री लवकरच करणार आहेत.
तेलंगाणा सरकारने याआधीच राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा पगार काही प्रमाणात कापण्याची घोषणा केली आहे. कर्मचाऱ्यांच्या पदानुसार ठरावीक प्रमाणात रक्कम कापली जाणार आहे. हा निधी कोरोना विषाणूला लढा देण्यासाठी वापरण्यात येणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री, राज्य मंत्री, आमदार, खासदार, महानगरपालिका प्रमुख आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी यांच्या पगारांमध्ये ७५ टक्के कपात करण्यात येणार आहे.
यासोबत आयएएस, आयपीएस, आयएफएस आणि इतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात ६० टक्के, तर इतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये ५० टक्के कपात करण्यात येणार आहे. तर चतुर्थश्रेणी आणि कंत्राटी कामगारांच्या पगारात १० टक्के कपात करण्यात येणार आहे.