हैदराबाद : तेलंगणाच्या नवीन उभारलेल्या सचिवालयाच्या आवारामध्ये एक मंदिर, चर्च आणि दोन मशीदी उभारण्यात येणार असल्याचे शनिवारी जाहीर करण्यात आले. पुढील विधानसभा सत्राच्या समाप्तीनंतर या सर्वांची पायाभरणी होणार आहे. जुन्या सचिवालयामध्ये एक मंदिर आणि दोन मशीदी होत्या. सचिवालयाची इमारत पाडताना या प्रार्थनास्थळांचेही नुकसान झाले होते. त्यामुळे नव्या सचिवालयामध्ये सरकारी खर्चाने यांची पुन्हा उभारणी केली जात आहे, असे मुख्ममंत्री कार्यालयाने स्पष्ट केले.
राज्यातील ख्रिश्चन समुदायाकडून अशी मागणी केली जात होती, की सचिवालयामध्ये आपलेही प्रार्थनास्थळ उभारले जावे. त्यामुळे नव्या सचिवालयात चर्चही उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रार्थनास्थळांमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असतील, असेही मंत्रालयाने सांगितले.
यासोबतच आंतरराष्ट्रीय स्तराचे इस्लामिक सेंटरही याठिकाणी उभारण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय यापूर्वीच झाला होता. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सेंटरचे काम रखडले होते. याचे कामही आता फास्ट ट्रॅकवर घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दोन प्रस्तावित मशीदी या ७५० वर्ग फूट एवढ्या असतील. तसेच, मंदिराची जागा १,५०० वर्ग फूट एवढी असेल.
मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आधीच्या सचिवालयाची इमारत पाडताना मंदिर आणि मशीदीच्या झालेल्या नुकसानाबाबत खेद व्यक्त केला होता. तसेच, नवीन सचिवालयाच्या इमारतीत आणखी भव्य प्रार्थनास्थळे उभारली जातील अशी घोषणा त्यांनी जुलैमध्ये केली होती.
हेही वाचा : 'कोरोनामुळं संसदेतील प्रश्नोत्तरांचा तास रद्द, मात्र, जेईई-नीटची परीक्षा होणार'