भुवनेश्वर : ओडिशाच्या कटक जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. घरातून पळून गेलेल्या एका १७ वर्षीय मुलीवर काही अज्ञातांनी २२ दिवस सामूहिक अत्याचार केले. पीडितेला जिथे डांबून ठेवले होते, तिथे शेजारी राहणाऱ्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तेथे धाड टाकली. यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जगतसिंहपूर जिल्ह्यात राहणारी ही मुलगी, आपल्या पालकांशी झालेल्या वादानंतर घरातून पळून गेली होती. यानंतर घरी परत जाण्यासाठी ती कटकच्या ओएमपी स्क्वेअर बस स्थानकावर थांबली असताना, एका व्यक्तीने तिला घरी सोडतो असे सांगितले. त्यानंतर ती त्या व्यक्तीसोबत गेली असता, त्याने तिला घरी सोडण्याऐवजी गतिरौतपटना गावामध्ये नेले.
यानंतर त्याने शेतामधील एका घरात तिला २२ दिवस डांबून ठेवले. याठिकाणी दोन जणांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केला, असे तिने सांगितले.
अशी झाली सुटका..
गेल्या काही दिवसांपासून शेतातील घरात काहीतरी संशयास्पद हालचाली दिसून आल्यामुळे, शेजारी राहणाऱ्या लोकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी याठिकाणी धाड टाकली असता, हा प्रकार उघडकीस आला. यानंतर एका आरोपीला अटक करण्यात आली असून, दुसऱ्याचा शोध सुरू आहे. कटक जिल्ह्याचे उपायुक्त प्रतीक सिंह यांनी ही माहिती दिली.
हेही वाचा : ...म्हणून पत्नीला दीडवर्ष शौचालयात ठेवले बंद; पतीविरोधात गुन्हा दाखल