नवी दिल्ली- तनिष्क या लोकप्रिय ज्वेलरी ब्रँडने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीला सोमवारी ट्विटरवर ट्रोल करण्यात आले. ही जाहिरात लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारी असल्याची टिका यावेळी तनिष्कवर करण्यात आली. त्यानंतर तनिष्कने ही जाहिरात मागे घेतली आहे.
गेल्या आठवड्यात तनिष्कने प्रसिद्ध केलेल्या 'इंटरफेथ बेबी शॉवर' या जाहिरातीला सोशल मीडियावरील हिंदुत्त्ववादी विचारांच्या लोकांनी लक्ष्य केले होते. यावेळी #BoycottTanishq हा हॅशटॅग ट्रेंड करण्यात आला. या जाहिरातीविरोधात ट्विटरवर उठलेल्या आवाजानंतर तनिष्कच्या यूट्यूब वाहिनीवरून हा व्हिडिओ काढून टाकण्यात आला आहे.
यावर प्रतिक्रिया देताना कॉंग्रेस खासदार शशी थरूर यांनी आज सकाळी या जाहिरातीवर बहिष्कार घालणाऱ्यांवर सडकून टिका केली. त्यांनी ट्विट करत " हिंदू-मुस्लिम ऐक्य हायलाइट करणाऱया तनिष्क ज्वेलरीच्या सुंदर जाहिरातीवर हिंदुत्ववाद्यांनी बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. जर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा यांना इतका त्रास होत असेल, तर इतक्या वर्षांपासून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या भारत देशाचा हे लोक बहिष्कार का करत नाही, असा प्रश्न विचारला आहे.
तसेच कॉंग्रेस नेते अभिषेक सिंघवी, राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी सदस्या शमिना शफीक यांनीही एकात्मतेचा संदेश देणाऱ्या जाहिरातीला पाठिंबा दर्शवत ट्विट केले आहे.
याआधी स्वत: ला भाजपाचा सदस्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेमचंद शर्मा यांनी सोमवारी ट्विट करत, तुम्ही मुस्लिम कुटुंबात हिंदूंची सून का दाखवत आहात, हिंदू कुटुंबात मुस्लिम सून का दाखवत नाहीत. आपण लवझिहाद यांना प्रोत्साहन देत आहात का, असा प्रश्न तनिष्कला विचारला होता.