चेन्नई - ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कझगम आघाडी आणि वेल्लोर येथील लोकसभेचे उमेदवार ए. सी. शानमुगम यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात मद्रास उच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. निवडणूक आयोगाने तामिळनाडूतील वेल्लोर मतदारसंघात गुरुवारी १८ एप्रिलला होणारे मतदान रद्द केले आहे. याआधी असा निर्णय घेतल्यामुळे भाजपला फायदा होऊ शकतो, असे द्रमुकचे उमेदवार काथिर आनंद यांनी आयोगाला पत्र लिहून म्हटले होते.
येथील मतदारांवर पैशाचा प्रभाव टाकण्याचे प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आल्याने निवडणूक आयोगाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना येथील निवडणूक रद्द करण्याची शिफारस केली होती. राष्ट्रपतींनी त्यानुसार वेल्लोरमधील अधिसूचना रद्द केली. याप्रकारे एखाद्या मतदारसंघातील लोकसभेची निवडणूक रद्द होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यानंतर डीएमकेचे उमेदवार काथिर आनंद यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात शानमुगम यांच्यावर मोठ्या प्रमाणात पैशाचे वाटप केल्याचा आरोप केला आहे. शानमुगम हे एआयडीएमकेच्या २ पानांच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.
द्रमुकचे ज्येष्ठ नेते दुराइमुरुगन यांचे पुत्र आणि वेल्लोर येथील पक्षाचे उमेदवार काथिर आनंद यांच्या घरातून २९ मार्चला साडेदहा लाखांची रोकड हस्तगत झाली होती. तसेच १ एप्रिलला दुराईमुरुगन यांच्या निकटच्या एका व्यक्तीच्या सिमेंट गोदामातून ११ कोटी ५३ लाख रुपये हस्तगत झाले होते. ही रोकड दुराईमुरुगन यांच्या महाविद्यालयातून या गोदामात हलवण्यात आली होती. यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला होता.