लखनौ - गो-धनाची सेवा करणाऱ्या जर्मन नागरिक फैडरीक यांच्या व्हिसाची मुदत वाढवून देण्याचा अर्ज नाकारण्यात आला. त्यामुळे त्यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. आता त्याबद्दल परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अधिकाऱ्यांना माहिती मागवली आहे.
गेल्या १५ वर्षांपासून फैडरिक इरिन उर्फ सुदेवी मथुरा येथील राधा कुंडमधील गो-धनाची सेवा करतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना भारत सरकारकडून यंदा पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यांना जर्मनला परत जायचे नसून भारतातच राहून गो-धनाची सेवा करायची आहे. मात्र, येत्या २५ जूनला त्यांच्या व्हिसाची मुदत संपत आहे. त्यामुळे त्यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या लखनौ येथील कार्यालयात व्हिसाची मुदत वाढवण्यासाठी अर्ज केला. मात्र, कुठलेही कारण न सांगता तो अर्ज नाकारण्यात आला. त्यामुळे फैडरिक नाराज झाल्या होत्या.
फैडरिक म्हणाल्या, मला भारतात राहून गो-धनाची सेवा करायची आहे. मात्र, व्हिसाची मुदत नाकारल्यामुळे मला परत जावे लागणार आहे. मी दिलेल्या सेवेसाठी मला पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते आणि आता मी भारतात राहणार नाहीतर पुरस्कार ठेवून काय करणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच व्हिसाची मुदत न वाढल्यास पद्मश्री पुरस्कार परत करणार असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, याबाबत सुषमा स्वराज यांनी दखल घेतली असून अधिकाऱयांकडून माहिती मागवली आहे. त्याबद्दल त्यांनी सुषमा स्वराज यांचे आभारही मानले आहे.