नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला अवमान नोटीस बजावली आहे. भाजप कार्यकर्त्या प्रियांका शर्मा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर मिम्स तयार केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. त्यावर न्यायालायाने शर्मा यांना सोडण्याचा आदेश दिला होता. मात्र ममता बॅनर्जी यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे त्यांना अवमान नोटीस पाठवण्यात आली आहे.
प्रियांका शर्मा यांना 10 मे रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर प्रियांका शर्मा यांचा भाऊ राजीव शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात या अटकेविरोधात धाव घेतली होती. यावर न्यायालयाने प्रियंका यांना तात्काळ सोडण्याचे आदेश दिले होते. मात्र, आदेशानंतर देखील प्रियांका शर्मा यांना 24 तासानंतर सोडण्यात आले होते.
अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या मेट गालामधील लुक्सवर सर्वत्र चर्चा झाली होती. सोशल मीडियावर देखील प्रियंकाची खिल्ली उडवण्यात आली होती. प्रियंकाचा तोच फोटो प्रियांक शर्मा यांनी वापरत त्याठिकाणी ममतांचा चेहरा लावला होता. शिवाय, तो फोटो आपल्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर देखील केला होता. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती.