भोपाळ - लोकसभा निवडणुकांसाठी मध्यप्रदेशच्या इंदूर लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळण्याची वाट पाहत असलेल्या सुमित्रा महाजन यांनी शेवटी निवडणूकच न लढवण्याचा निर्णय केला आहे. तर, आजच्या तारखेपर्यंत अद्यापही पक्षाने उमेदवार दिलेला नाही. यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. २०१४ मध्ये सुमित्रा महाजन यांनी या मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती.
पक्षामध्ये ताई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुमित्रा महाजन यांचा संयम तुटलेला दिसतो. त्यामुळेच त्यांनी शेवटी निर्णय घेऊन निवडणूक न लढवण्याचा निश्चय केलेला दिसतो. त्यांना तिकीट न मिळाल्याचे दुःख मात्र त्यांच्या पत्रातून साफ छळकत आहे. या जागेवरुन उमेदवार देण्यासाठी पक्ष गोंधळात दिसत आहे. पक्षाला या मतदार संघातून उमेदवार देण्यासाठी संकोच होत असावा, असे वाटते. या जागेवरुन उमेदवारी देण्याची जबाबदारी आपण पक्षावर सोपवली होती. मात्र, पक्ष आताही गोंधळातच दिसतो. त्यामुळे मी यंदा निवडणूकच लढवणार नाही. आता पक्षाने स्वतंत्रपणे उमेदवार निवडावा, असे महाजन यांनी म्हटले आहे.
मध्यप्रदेशमध्ये चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. सुमित्रा महाजन यांनी या मतदार संघातून तब्बल ८ वेळा निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे ही जागा भाजपच्या पारड्यात आहे, असे म्हटले जाते. यावेळीही सुमित्रा महाजन यांना भाजप उमेदवारी देणार अशी चर्चा होती. त्यासाठी त्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये कार्यकर्त्यांच्या भेटी घेण्यासही सुरुवात केली होती. मात्र, त्यांच्या पत्रामुळे आता त्या निवडणूक लढवणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे.
इंदूरच्या जनतेने मला आत्तापर्यंत प्रेम दिले. ज्या ज्या लोकांनी मला सहकार्य केले. त्या सर्वांची आपण आभारी आहे. पक्ष लवकरच आपला निर्णय घेऊन उमेदवार देणार अशी अपेक्षा आहे, असेही महाजन यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. या जागेवरुन मात्र पक्ष आता कोणाला उमेदवारी देणार हे पाहण्यासारखे झाले आहे. इंदूरमध्ये १९ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यामुळे पक्षाला आता लवकर निर्णय घ्यावे लागणार.