गांधीनगर - लॉकडाऊनमुळे गुजरातेत अनेक राज्यातील मजूर, कामगार अडकून पडले आहेत. या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ गावी जायचे आहे. सरकारने नुकतीच स्थलांतरित मजूर आणि इतर राज्यात असलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या मूळ गावी जाण्याची परवानगी दिली होती. यामुळे गुजरातच्या अहमदाबादेतील स्थलांतरित कामगार घरी जाण्यासाठी सज्ज आहेत. उत्पन्नाचा कुठलाही स्त्रोत न राहिल्याने या मजुरांना मूळ गावी जाणे भाग आहे.
केंद्र सरकारने मजूर आणि विद्यार्थ्यांना आंतराराज्य प्रवास करण्याची मुभा दिली. यामुळे गुजरात सरकारने यावर उपाय म्हणून राज्यात असणाऱ्या मजुरांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्याचा निर्णय घेतला. यामध्ये बहुदा उत्तर प्रदेशातील मजुरांची संख्या जास्त आहे, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अहमदाबादेतील स्थलांतरित कामगारांनी घरी जाण्यासाठी आधीच आपले सामान पॅक केले आहे. माझ्याजवळ पैसै नसल्याने माझे आणि माझ्या कुटुंबाचे कठीण झाले आहे. लॉकडाऊनमुळे आम्ही हलाखीच्या परिस्थितीत आहोत. मी महिन्याला १३ हजार रुपये कमवायचो. मात्र, गेल्या महिनाभरापासून काहीच उत्पन्न झाले नसल्याचे शाम सिंग यांनी सांगितले. यामुळे आम्हाला आमच्या गावी जायचे आहे. मी दैनंदिन गरजा भागवण्यासाठी मित्रांकडून पैसै उसणे घेतले असल्याचेही सिंग यांनी सांगितले. मूळ मध्य प्रदेशच्या मोरेना येथील रहिवासी असलेले सिंग सध्या कामानिमित्त अहमदाबादेत आहेत.
गावाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे आपण आनंदी असल्याचे सिंग सांगतात. मी गावाकडे जाऊन शेती वगेरै करून माझ्या कुटुंबाचे पालनपोषण करेन. माझ्या राज्यात मला चांगले काम मिळाले तर मी परत इकडे (गुजरात) येणार नाही, असेही सिंग म्हणाले.
जवळपास ४ हजार स्थलांतरित मजुरांना वेगवेगळ्या निवारागृहात ठेवण्यात आले आहे. त्यांना लवकरच त्यांच्या राज्यात परत पाठवले जाईल, असे कामगार आणि रोजगार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विपूल मित्रा यांनी सांगितले.