चंडीगड - पंजाबमधील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शनिवारी एका दिवसात १८७ कोरोना रुग्ण आढळले असून हा आत्तापर्यंतचा सर्वोच्च आकडा आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नांदेड येथून परतलेल्या १४२ भाविकांचा समावेश आहे. पंजाबमधील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७७२ झाली आहे.
काही दिवसांपूर्वी नांदेडच्या हुजूर साहिब गुरुद्वारा येथून ३ हजार ५०० भाविक पंजाबमध्ये परतले आहेत. तेव्हापासून पंजाबमधील कोरोनारुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शुक्रवारी देखील कोरोनाचे १०५ नवीन रुग्ण समोर आले होते त्यात ९१ नागरिक नांदेडवरून परतलेले होते.
शनिवारी दिवसभरात अमृतसरमधून ५३, होशियारपूरमधून ३१, मोहामधून २२, पटियाला आणि लुधियानामधून प्रत्येकी २१, जालंधरमधून १५, फिरोजपूरमधून ९, फतेगड साहिबमधून ६, मुक्तसरयेथून ३, मोहालीतून २ आणि गुरुदासपूर, संगरुर, कपूरथळा, रुपनगरमधून कोरोनाचा प्रत्येकी एक रुग्ण आढळला.
आत्तापर्यंत अमृतसरमध्ये कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या आहे. १४३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद अमृतसरमध्ये आहे. पंजाबमध्ये २० रुग्णांचा मृत्यू झाला असून ११२ रुग्ण बरे झाले आहेत. २४ हजार ८६८ नागरिकांची कोरोनाचाचणी करण्यात आली आहे. त्यातील १९ हजार ३१६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ४ हजार ७८० अहवाल येणे बाकी आहे.