नवी दिल्ली - भारतातील कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशात एकूण 3 हजार 967 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 100 जण दगावले आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत.
देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 81 हजार 970 झाला आहे, यात 51 हजार 401 अॅक्टिव्ह केस आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर 27 हजार 920 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तसेच 2 हजार 659 जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
सध्या कोरोनाशी लढण्यासाठी जगातील सर्वच देश युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोनाग्रस्तांची चाचणी लवकर होणे आणि त्यांचे निदान कमीत-कमी वेळेत होणे. कोरोना संसर्गामुळे देशातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता व्यापार, उद्योगधंदे, वाहतूक, बाजारपेठासह सर्वकाही ठप्प आहे.