पठाणकोट - जम्मू काश्मीरमधील कठुआ येथील ८ वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी पठाणकोट कोर्टाने सरपंच सांझी रामसह ६ आरोपींना दोषी ठरवले आहे. सांझी रामसह तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर, इतर २ पोलिसांना प्रत्येकी ५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आठ आरोपींपैकी विशाल या एका आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. उरलेल्या ७ जणांपैकी एक अल्पवयीन आहे.
सोमवारी सकाळी या प्रकरणातील ७ आरोपींविरोधात सुनावणी झाली.
जानेवारी २०१८ मध्ये चिमुकल्या मुलीवर अतिशय घृणास्पद अत्याचार करण्यात आले होते. या प्रकरणी मागील वर्षी एप्रिलमध्ये ८ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. यातील एक आरोपी अल्पवयीन आहे.
आरोपपत्रानुसार, सांझी राम या अत्याचार आणि हत्याकांडाचा मास्टारमाईंड होता. चिमुकलीच्या अपहरणानंतर तिला सांझी रामच्या देखरेखीखालील मंदिरात डांबून ठेवण्यात आले होते. आरोपींनी येथेच मुलीवर अमानुष अत्याचार केले होते. कोर्टाने या प्रकरणी पोलीस अधिकारी दीपक खजुरिया, सुरेंद्र वर्मा आणि अरविंद दत्ता, हेड कॉन्स्टेबल तिलक राज आणि प्रवेसकुमार उर्फ मन्नू यांना दोषी ठरविले आहे. तर सांझी रामचा मुलगा विशाल याची मुक्तता केली आहे.
काय आहे प्रकरण ?
जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथील ८ वर्षांची मुलगी मागलीवर्षी १० जानेवारी रोजी बेपत्ता झाली होती. त्यानंतर छिन्नविछिन्न अवस्थेतील तिचा मृतदेह जंगलामध्ये सापडला होता. आरोप आहे की, अपहरणानंतर मुलीला एक मंदिरात डांबून ठेवण्यात आले आणि कित्येक दिवस तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते.