जयपूर - आमदार खरेदी प्रकरणात 'एसओजी'ने गुरुवारी जयपूरमध्ये राहणारे संजय जैन यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची १२ तासांपेक्षा जास्त चौकशी करण्यात आली. यावेळी एसओजीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अशोक राठोड यांच्यासह तीन अधिकाऱ्यांनी वेगवेगळी चौकशी केली. यामध्ये संजय जैन यांनी काही काँग्रेस आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. तसेच भाजपाचे काही मोठे नेते सहभागी असल्याचे देखील समोर आले आहे.
गुरुवारी सायंकाळी सोशल मीडियावर काही ऑडिओ क्लिप व्हायरला झाल्या होत्या. यामध्ये आमदारांच्या खरेदी प्रकरणाचा उल्लेख आहे. तसेच यामध्ये जो आवाज आहे तो संजय जैन, काँग्रेस आमदार आणि भाजपाच्या एका मोठ्या नेत्याचा असल्याचे सांगितले जात आहे.
संजय जैन यांनी आमदार खरेदी प्रकरणात एक मध्यस्थी म्हणून काम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे एसओजी मुख्यालयात त्यांची चौकशी करण्यात आली. तसेच अजमेरमधील ब्यावरमधून अटक करण्यात आलेला भरत आणि उदयपूर येथील अटक केलेला अशोक यांचे संजय जैन यांच्यासोबत काही संबंध नाही ना? याबाबत देखील चौकशी केली जात आहे. दरम्यान, आज देखील जैन यांना चौकशीसाठी एसओजी मुख्यालयात बोलावले जाऊ शकते.
राजस्थान सत्तासंघर्ष -
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपकडून घोडेबाजार होत असून काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर राजस्थान सरकारमध्ये खळबळ माजली. मुख्यमंत्री गेहलोत आणि सचिन पायलट यांनी आम्ही सरकार टिकवून ठेवू, असे म्हटले होते. मात्र, त्यानंतर गेहलोत यांनी कॅबिनेटची बैठक बोलावली. त्यावेळी सचिन पायलट यांच्यासह त्यांच्या समर्थनात असलेले काही आमदार अनुपस्थित होते. त्यामुळे सरकार पाडण्यासाठी पायलट यांचा पाठिंबा असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी बैठक घेत सचिन पायलट यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री पदावरून हटवले. तसेच त्यांच्यासोबत इतर तीन मंत्र्यांना देखील हटवले. आता भाजपाकडून खरच घोडबाजार करण्याचा प्रयत्न झाला होता का? याबाबत चौकशी सुरू आहे.