धार - सध्या कोरोना विषाणूमुळे देशात लॉकडाऊन सुरू आहे. संपूर्ण देश सध्या कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनचे पालन करण्याचे आवाहन केले होते. तसेच, कोरोना विषाणूशी लढण्यासाठी आर्थिक मदतीचेही आवाहन केले होते. त्यामुळे त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देऊन आत्तापर्यंत बऱ्याच जणांनी शक्य होईल तेवढी आर्थिक मदत केली आहे. या मदतीसाठी आता चिमुकल्यांनी देखील मदतीचा हात पुढे सरसावला आहे.
धार जिल्ह्यातील कुक्षी विधानसभा क्षेत्रातील निसरपूर येथील जैन कुटुंबातील लहानग्यांनी आपल्या गल्ल्यातील तब्बल ४ हजार ४९० रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून दिली आहे. जैन कुटुंबातील १० वर्षाचा कविष, मुलगी प्रियल आणि अडीच वर्षाचा मुलगा विवान आणि विएना यांनी ही मदत दिली आहे.
या लहान चिमुकल्यांनी ही मदत केल्यानंतर तहसीलदार सुनील डावर यांनी ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्यास दिली आहे. तसेच त्यांनी या लहान मुलांची प्रशंसा देखील केली. कोरोना विषाणूच्या या लढ्यात या चिमुकल्यांनी दिलेले हे योगदान अमुल्य असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.