गांधीनगर - राष्ट्रीय आपत्ती दल निवारण (एनडीआरएफ) यांनी 'सायक्लोन वायू' वादळाच्या तडाख्यात येणाऱ्या दीव आणि गुजरात येथील ६५ जणांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. बुधवारी झालेल्या या कार्यात स्थानिक पोलीस आणि सरकारी यंत्रणानीही मदत केली.
सायक्लोन 'वायू' वादळ गुजरातच्या किनारपट्टीवर १३ जूनला पहाटे पोहचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे वादळ जवळपास ११०-१२० ते १३५ प्रतिकिमी वेगाने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे, सायक्लोनच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेनेही काळजी घेताना १२ जून ते १४ जून दरम्यान, वेरावल, ओखा, पोरबंदर, भावनगर, भूज आणि गांधीधाम भागातील पॅसेंजर आणि एक्सप्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. खबरदारी म्हणून आपत्कालीन परिस्थितीसाठी ६ ते १० डब्यांच्या विशेष गाड्या तयार करण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वे गांधीधाम, भावनगर, पारा, पोरबंदर, वेरावल आणि ओखा स्टेशनमधून विशेष गाडी सोडणार आहे. याद्वारे, प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येणार आहे. यासाठी रेल्वेच्या सर्व यंत्रणांना आवश्यक ती मनुष्यबळ पुरवण्यासाठी सांगण्यात आले आहे. यासोबतच आपत्कालीन परिस्थितीसाठी जेसीबी, ट्री कटर्स, पाण्याच्या टाक्या, ट्रॅक्टर्स आणि जनरेटर्सची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.