नवी दिल्ली : गेल्या २४ तासांमध्ये देशात तब्बल ७८ हजार ३५७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंतची एका दिवसात नोंदवली गेलेली ही सर्वोच्च रुग्णसंख्या आहे. यानंतर देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्याही ३७ लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी याबाबत माहिती दिली.
यासोबतच, काल दिवसभरात एकूण १,०४५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या ६६ हजार ३३३ झाली आहे. आतापर्यंत देशभरात ३७ लाख ६९ हजार ५२४ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी ८ लाख १ हजार २८२ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत २९ लाख १ हजार ९०९ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.
मंगळवारी एका दिवसात १० लाख १२ हजार ३६७ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या, तर आतापर्यंत देशात एकूण ४.४३ कोटी कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी ५४ टक्के रुग्ण हे १८ ते ४४ या वयोगटातील आहेत. तर एकूण मृत्यूंपैकी ५१ टक्के रुग्ण हे ६० वर्षांहून अधिक वयोगटातील होते.
तसेच, एकूण रुग्णसंख्येच्या आठ टक्के रुग्ण हे १७ वर्षांहून लहान आहेत; तर एकूण मृत्यूंच्या एक टक्के रुग्ण हे १७ वर्षांहून लहान होते.