मुंबई - एका प्रसिद्ध हिंदी गाण्यामधील "जाना था जापान पहुंच गए चीन.." ही ओळ बहुतांश लोकांच्या परिचयाची असेल. मात्र, उत्तर प्रदेशातील मजुरांसमोर या काल्पनिक ओळीसारखाच प्रसंग घडला आहे. मुंबईहून उत्तर प्रदेशच्या गोरखपूरला जाण्यासाठी श्रमिक विशेष रेल्वे ही चक्क ओडिशाला जाऊन पोहोचली, आणि हजारो स्थलांतरीत मजुरांचा घरी जाण्याचा आनंद मालवला.
लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेल्या मजूरांना आपापल्या घरी पोहोचवण्यासाठी सरकारने श्रमिक विशेष रेल्वेंची सोय केली आहे. यांपैकीच एक रेल्वे वसई रोड स्थानकातून गोरखपूरला निघाली होती. गुरूवारी निघालेली ही रेल्वे, उत्तर प्रदेशला न जाता ओडिशाच्या राऊरकेला स्थानकावर पोहोचली. त्यामुळे यामध्ये प्रवास करत असणाऱ्या प्रवाशांना धक्का बसला. त्यांपैकी काहींनी ट्विटरचा आधार घेत आपला रोष व्यक्त केला. काहींनी तर चालकाने एखादा "राँग टर्न" घेतला असल्याची भीतीही व्यक्त केली.
रेल्वेने मात्र याबाबत स्पष्टीकरण देत, हे चुकून नाही तर मुद्दाम केले असल्याचे म्हटले आहे. रेल्वे मार्गांवरील ट्रॅफिक जॅम आणि स्थानकांवरील गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. राऊरकेला स्थानकाचे व्यवस्थापक अभय मिश्रा यांनी सांगितले, की आम्हाला अशी रेल्वे येणार असल्याची माहिती आधीपासूनच मिळाली होती. त्यादृष्टीने आम्ही तयारी केली होती.
याठिकाणी ही रेल्वे १५ मिनिटे थांबवण्यात आली होती. यादरम्यान पाणी आणि इतर सामान भरण्यात आले. तसेच इतर काही गोष्टी तपासल्यानंतर ही गाडी गोरखपूरला पाठवण्यात आली. असे होणे मोठी गोष्ट नाही. श्रमिक विशेष रेल्वे या विनाथांबा जात असल्यामुळे, कित्येक रेल्वे या पाणी भरण्यासाठी आणि इतर गोष्टींसाठी काही स्थानकांवर थांबवण्यात येतात. त्यामुळे प्रवाशांनी याबाबत चिंता करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : धक्कादायक! ओडिशामधील क्वारंटाईन सेंटरमध्ये जेवणात आढळला मृत सरडा