नवी दिल्ली - पूर्व लडाखमधील गलवान व्हॅलीत चीनी सैनिकांबरोबर झालेल्या झटापटीत 20 भारतीय सैनिकांना वीरमरण आल्यानंतरही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार शांत का? असा सवाल काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केला आहे. भारताची भूमी चीनने घेण्याआधी काहीतरी कृती करणारे सरकार भारताला हवे आहे, असे म्हणत मोदींच्या मौनावर टीका केली.
'आपल्या भूमीला आणि देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण झाला आहे. आपले जवान आणि अधिकारी शहीद झाले आहेत. आपण फक्त शांत बसणार का? जनतेला सत्य माहिती व्हायला पाहिजे. भारताची भूमी दुसरे कोणीही घेण्याआधी काहीतरी करणारे सरकार भारताला हवे आहे, असे ट्विट प्रियंका गांधींनी केले आहे.
मोदीजी समोर या, चीन विरोधात उभे राहण्याची हीच वेळ आहे, असे प्रियंका गांधी म्हणाल्या. गलवान व्हॅली परिसरात चीनी सैनिकांबरोबर झालेल्या झटापटीत 20 भारतीय सैनिकांना विरमरण आले आहे. त्यानंतर देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधी पक्षांकडून सर्वपक्षीय बैठक घेण्याची मागणी होत आहे. तसेच सरकारने देशाला आत्मविश्वासात घेवून खरे काय ते सांगावे, असे काँग्रेसने म्हटले आहे.