नवी दिल्ली - शिवसेनेने 'रावणाच्या लंकेत बुरखा बंदी होऊ शकते तर, रामाच्या अयोध्येत का नाही,' असे म्हटले होते. यावरून वादाला सुरुवात झाली आहे. ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM)चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी 'शिवसेनेकडे ज्ञानाचा अभाव आहे. त्यांचे वक्तव्य हे आचार संहितेचे उल्लंघन आहे. मी निवडणूक आयोगाला याची तातडीने दखल घ्यावी, अशी विनंती करतो,' असे ओवेसी यांनी म्हटले आहे.
'शिवसेनेकडे ज्ञानाचा अभाव आहे. त्यांना भारताचे संविधान काय समजणार? खासगी जीवनातील निर्णय किंवा निवड हा कोणत्याही व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. शिवसेनेचे वक्तव्य हे आचार संहितेचे उल्लंघन आहे. मी निवडणूक आयोगाला याची तातडीने दखल घ्यावी, अशी विनंती करतो. हा (विचार किंवा मतांमध्ये) ध्रुवीकरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे,' असे ओवेसी यांनी म्हटले आहे.
सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा नकाब परिधान करणे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य ठरेल, असे जाहीर करुन श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी साहस आणि धैर्याचे दर्शन घडवले आहे. रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार?, असा सवाल उपस्थित करतानाच भारतातही बुरखाबंदी करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
'एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी शिवसेनेची बुरखा बंदीची मागणी आक्षेपार्ह असल्याचे म्हटले आहे. शिवसेना बुरखा बंदीच्या मागणीआडून मुस्लिम विरोधी वातावरण निर्मितीचा प्रयत्न करत आहे असा आरोप त्यांनी केला. शिवसेनेची ही मागणी म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन असून निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी' असे ओवेसी म्हणाले.