पाटना - देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमामला आज(बुधवारी) दिल्लीमध्ये आणण्यात येत आहे. मंगळवारी बिहारमधील जहानाबाद येथील काको या गावातून त्याला अटक करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखा आणि बिहार पोलिसांनी संयुक्त कारवाई करत इमामला अटक केली होती.
शरजीलला अटक करण्यात आल्यानंतर जहानाबाद येथे त्यांची आरोग्य चाचणी करण्यात आली होती. काको पोलीस ठाणे क्षेत्रातून अटक केल्यानंतर त्याला जहानाबादच्या जिल्हा न्यायाधिशांसमोर हजर करण्यात आले होते. तेथून ट्रांन्झिट डिमांड मिळाल्यानंतर त्याला पटनाला आणण्यात आले होते. आता तेथून त्याला दिल्लीला आणण्यात येत आहे.
अलिगढ मुस्लीम विद्यापीठात केले होते वादग्रस्त वक्तव्य
मागील डिसेंबर महिन्यात अलिगढ मुस्लीम विद्यापीठात करण्यात आलेल्या प्रदर्शनात त्याने वादग्रस्त वक्तव्य केले होते. आसामला भारतापासून वेगळे करायला पाहिजे, असे तो म्हणाला होता. भारताच्या पुर्वकडील राज्यांना जोडणारा भाग म्हणजे चिकन्स नेक( चिंचोळा भूप्रदेश) तेथे चक्का जाम करुन आसामला भारतापासून वेगळे करायला हवे, असे तो म्हणाला होता. या वक्तव्यानंतर दिल्ली, आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि उत्तरप्रदेशात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. देशद्रोहाच्या आरोपाबरोबरच दंगल घडवल्यासंबधी कलमांखाली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जहानाबादमध्ये बसला होता लपून
क्राईम ब्रॅन्चची पाच पथके त्याचा शोध घेत होती. बिहारमधील जहानाबादमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी पोलिसांनी जहानाबाद येथील काको पोलीस ठाणे क्षेत्रातून त्याला अटक केली. दिल्लीत आणल्यावर त्याची सखोल चौकशी होणार आहे.