नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव प्रताप रूडी यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. जे काही झाले त्यामुळे शिवसेना हा केवळ चेष्टेचा विषय झाला आहे. तसेच, शिवसेनेचा अहंकार चिरडला गेला आहे असे वक्तव्य त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केले.
यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्रात लागू झालेल्या राष्ट्रपती राजवटीचेही समर्थन केले आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होणे गरजेचे होते. राज्यपालांना जेव्हा वाटेल, की सरकार स्थापन होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे, तेव्हा राष्ट्रपती राजवट हटवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यपाल बी. एस. कोश्यारींच्या विरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. याबाबत बोलताना रूडी म्हणाले, की शिवसेनेला जिथे जायचे आहे तिथे जाउद्या. आम्ही गेल्या १८ दिवसांपासून सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करतो आहोत, आणि भाजप हा सर्वात जास्त जागा मिळालेला पक्ष आहे.
आमची नैसर्गिकरित्या शिवसेनेसोबत युती आहेच. मात्र, यावेळी शिवसेनेने जी भूमीका घेतली ती पाहता मी शिवसेनेला एवढेच सुचवेल, की त्यांनी जनादेशाचा आदर केला पाहिजे.
शिवसेना ही सत्तास्थापनेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा करत आहे. याबाबत बोलताना रूडी म्हणाले, की भाजपने राज्यपालांना आपल्याकडे बहुमत नसल्याचे सांगितल्यानंतर शिवसेनेने हीच संधी साधली. या संधीचा फायदा उचलण्यासाठी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारख्या पक्षांशी बोलणी सुरु केली. मात्र, आता ते या दोन्ही पक्षांनी आपल्याला फसवल्याचा कांगावा करत आहेत. हे विशेष आहे, कारण शिवसेनेची त्या दोन पक्षांशी नव्हे, तर आमच्याशी युती आहे.
शिवसेनेने जर माफी मागितली, तर पुन्हा शिवसेनेसोबत युती करण्याचा विचार आहे का, असे विचारले असता रूडी यांनी त्यावर बोलण्यास नकार दिला.
हेही वाचा : राज्यात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू; जाणून घ्या कलम ३५६