श्रीनगर - दोन विविध ठिकाणी सुरू असलेल्या कारवाईत लष्कराला यश आले असून यामध्ये आठ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. दक्षिण काश्मिरच्या शोपियान आणि पुलवामा जिल्ह्यात ही चकमक झाली आहे.
गुरुपासून सुरू झालेल्या दोन्ही ऑपरेशन्सला आज आणखी यश मिळाले. रात्री काही काळ ऑपरेशन थांबवण्यात आले होते. मात्र आज पहाटे पुन्हा सुरुवात झाली. यामध्ये पुलवामात जैश ए महम्मदच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. तर शोपियन प्रांतात जैश आणि हिजबूल मुजाहिदिनच्या एकूण पाच जणांचा खात्मा करण्यात आलाय.
दरम्यान गुरुवारी पुलवामातील पाम्पोर येथे मीज परिसरात सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली होती. यावेळी काही दहशतवाद्यांनी सुरक्षासक्षकांवर हल्ला चढवल्याने त्यांना कंठस्नान घालण्यात आले. दहशतवाद्यांनी शोध पथकावर गोळीबार केल्याने या ठिकाणी चकमक सुरू झाल्याची माहिती अधिकऱ्यांनी दिली.
गुरुवारपासून 'सर्च ऑपरेशन' सुरू
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा आणि शोपियान जिल्ह्यात चकमकीदरम्यान सुरक्षा दलांनी गुरुवारपासून चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. मशिदीमध्ये आसरा घेतलेल्या 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश मिळालं आहे. तर इतर दोन जणांचा गुरुवारी खात्मा केला होता. आज ठार केलेल्या दहशतवाद्यांचा आकडा 8 वर गेला आहे.
गुरुवारी पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथील पंपोर भागात झालेल्या चकमकीत अज्ञात दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. त्यानंतर दोन दहशतवाद्यांनी लपण्यासाठी एका मशिदीचा आसरा घेतला होता. दरम्यान मशिदीत लपून बसलेल्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षादलांनी ठार केले. सध्या या भागात शोध मोहीम सुरू असल्याची माहिती डीजीपी यांनी दिली.