नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने राफेल प्रकरणातील स्वतःच्या निकालाविरोधात आलेल्या याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी प्रकरण पुन्हा सुरू करण्यास मंजुरी दिली. यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी 'आता सर्वोच्च न्यायालयानेही चौकीदार चोर असल्याचे मान्य केले आहे,' असे वक्तव्य केले होते. मात्र, या वक्तव्यामुळे आता स्वतःच अडचणीत आले आहेत. २२ एप्रिलपर्यंत या वक्तव्याचे स्पष्टीकरण द्यावे, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.
राहुल गांधींनी सदर वक्तव्य मीडियासमोर आणि लोकांसमोर केले होते. यातून लोकांची दिशाभूल केल्याचा ठपका राहुल यांच्यावर ठेवण्यात आला आहे. भाजपच्या मीनाक्षी लेखी यांच्या याचिकेनंतर सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना नोटीस बजावली. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी राहुल यांच्या वक्तव्यानंतर न्यायालयाचा राफेलसंबंधीचा निर्णयही पुन्हा स्पष्ट केला आहे.
'आम्ही याविषयी स्पष्ट विधान केले होते. मात्र, संबंधिताने (राहुल गांधींनी) ते चुकीच्या पद्धतीने मीडिया आणि लोकांसमोर सादर केले. न्यायालयाने अशा प्रकारचे निरीक्षण नोंदवलेच नव्हते. आम्ही केवळ सादर केलेल्या कागदपत्रांची विश्वासार्हता आणि स्वीकारार्हता यांची पडताळणी करण्याचे ठरवले होते,' असे सरन्यायाधीश गोगोई यांच्या नेतृत्वाखालील ३ न्यायमूर्तींनी स्पष्ट केले.
'मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानू इच्छितो. संपूर्ण देश 'चौकीदार चोर' असल्याचे म्हणत आहे. सर्वोच्च न्यायालयाने न्याय दिला, यासाठी आनंदोत्सव साजरा करण्याचा हा दिवस आहे,' असे वक्तव्य राहुल यांनी आपल्या उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघात केले होते. यानंतर राहुल गांधींनी स्वतःचे शब्द सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडून आले असल्याचे सांगत न्यायालयाचा अपमान केला असल्याचा आरोप केला आहे.
आता 'सर्वोच्च न्यायालयाने आम्ही असे विधान कधीच केले नसल्याचे तसेच, निरीक्षण नोंदवले नसल्याचे सांगत' राहुल गांधींकडे उत्तर मागितले आहे.