नवी दिल्ली - काँग्रेसच्या जाहीरनामा तयार करण्यापूर्वी लोकांचे मत विचारात घेण्यात आले असल्याचे इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी म्हटले आहे. आम्ही जाहीरनामा तयार करण्यापूर्वी ५ ते ६ महिन्यांपासून लोकांचे मत जाणून घेत होतो. आम्ही देश-विदेशात फिरलो. गावकऱ्यांशी बोललो. आम्ही यासंदर्भात दुबईमध्ये मोठी बैठक घेतली ज्यात १२ देशातील सदस्यांचा सहभाग होता, असे पित्रोदा यांनी सांगितले.
जाहीरनाम्यात वेगवेगळ्या ५२ गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. जर आम्ही सत्तेत आलो तर या जाहीरनाम्याची पूर्णत: अंमलबजावणी करण्यात येईल, याची मी खात्री देतो, असेही पित्रोदा म्हणाले. आम्ही चुकीची आश्वासने दिली नाहीत. आम्ही जेव्हा काही बोलतो ते करून दाखवतो, असेही पित्रोदा यांनी सांगितले.
ईव्हीएमबाबत समाधानी नाही; १ वर्षासाठी ईव्हीएम अभ्यासासाठी द्या -
अभियंता आणि तांत्रिक तज्ज्ञ म्हणून मी ईव्हीएमबाबत समाधानी नाही. मात्र, मी ईव्हीएमबाबत एखादी गोष्टी पिन-पॉईंट करू शकत नाही कारण आमच्याकडे ईव्हीएम नाही. जर आम्हाला कोणी अभ्यास करण्यासाठी १ वर्ष ईव्हीएम दिले तर आम्ही तुम्हाला याबाबतीत नक्कीच काहीतरी सांगू शकू, असेही पित्रोदा म्हणाले. तुम्हाला डिझाईन आणि सॉफ्टवेअर समजून घेणे गरजेचे आहे. प्रत्येक सिग्नलचा तपास करायला हवा. त्यानंतर तुम्ही काहीतरी सांगू शकाल. मात्र, एक गोष्ट तर निश्चित आहे की यामध्ये काहीतरी अडचण आहे. अडचण नक्की काय आहे ते मात्र आम्हाला माहिती नाही, असेही पित्रोदा म्हणाले.