नवी दिल्ली - वरिष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी राहुल गांधींना घरचा आहेर दिला आहे. 'राहुल गांधींनी मैदान सोडून पळ काढला हेच पक्षासाठी सर्वांत वाईट ठरले. काँग्रेसवर पराभवानंतर अशी वेळ इतिहासात प्रथमच आली की, पक्षाचा त्यांच्या नेत्यावरचा विश्वासच उडाला. जर ते (राहुल) पदावर थांबले असते तर, पराभवाची कारणमीमांसा करणे अधिक सोपे झाले असते. तसेच, पुढील काळातही विविध परिस्थितींमध्ये लढणे शक्य झाले असते,' असे खुर्शीद म्हणाले.
खुर्शीद यांच्या वक्तव्यानंतर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 'आतापर्यंत पक्षामध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीत पराभव का पत्करावा लागला, याच्या कारणांवर चर्चाही झालेली नाही. सध्या पक्ष एका आव्हानात्मक स्थितीतून जात आहे. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार पडणार आहेत. या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या विजयाची शक्यता कमी आहे. तसेच पक्ष सध्या आपले भविष्यही ठरवू शकत नाही अशा परिस्थितीत पोहोचला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या राजीनाम्यामुळे पक्षासमोरच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे,' असे खुर्शीद पुढे म्हणाले. 'राहुल त्यांच्या पदावर राहून खंबीर राहिले असते, तर या समस्यांमधून मार्ग काढणे शक्य झाले असते,' असेही ते म्हणाले.
'काहीही झाले तरी आम्ही पक्ष सोडणार नाही. आम्ही असे लोक नाही, ज्यांनी पक्षाकडून फक्त घेण्याचे काम केले आणि अडचणींचा, संकटांचा काळ आल्यानंतर सोडून पळाले,' असेही सांगण्यास खुर्शीद विसरले नाहीत. यातून त्यांनी पक्षातून बाहेर पडलेल्या गयारामांनाही टोला लगावला आहे.