नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आर्थिक शाखा असलेल्या स्वदेशी जागरण मंचाने चीन हा भारताचा शत्रुराष्ट्र असल्याचे म्हणत चीनी कंपन्यांवर बंदीची मागणी केली आहे. पुलवामाच्या हल्ल्यानंतरही चीनने जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला दहशतवादी म्हणून घोषित करण्यास नकार दिला आहे. यामुळे त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून दहशतवाद्यांचे समर्थन करणाऱ्या शत्रुराष्ट्राला भारतातून आर्थिक फायदा मिळू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.
चायनीज कंपन्यांच्या इंटरनेट सेवा वापरुन भारताने त्यांना आर्थिक फायदा पोहोचवणे थांबवावे. भारतीय सरकारच्या मैत्रीपूर्ण धोरणामुळे चीनी ऑनलाईन कंपन्यांना प्रचंड फायदा होत आहे, असे त्यांनी पंतप्रधानांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे. टिक टॉक सारख्या चायनीज अॅपचे जगभरात ५० लाख यूजर्स आहेत. त्यापैकी २० लाख यूजर्स फक्त भारतातील आहेत.
गेल्या दोन वर्षात चायनीज सोशल मीडिया आणि ई कॉमर्स कंपन्यांचा भारतात मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाला आहे. यामुळे चाईल्ड पॉर्नोग्राफी आणि देशविरोधी घटनांना वाव मिळत आहे. त्यासोबतच चायनीज कंपन्यांच्या आक्रमक बाजारपेठेमुळे राष्ट्रीय सुरक्षादेखील धोक्यात आल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. येत्या काही वर्षात हुवाई आणि झेडटीई सारख्या कंपन्या भारतातील टेलिकॉम क्षेत्राची बाजारपेठ काबीज करण्याचा धोकाही स्वदेशी जागरण मंचाने व्यक्त केला आहे.
पाकिस्तानला खऱ्या अर्थाने आर्थिक रसद पुरवणारा देश चीनच असून भारताच्या सुरक्षेला या दोन्ही शेजाऱ्यांपासून मोठा धोका आहे. त्यांच्या कुरापतींना आळा घालण्यासाठी कडक आर्थिक निर्बंधांचे उपाय योजले नाही तर भविष्यातही अशा समस्या पुन्हा उत्पन्न होत राहतील, असा धोका स्वदेशी जागरण मंचाने आपल्या पत्रात व्यक्त केला आहे.