रांची - 'हिंदू शब्दामुळे भारताच्या अमूल्य संस्कारांचे स्मरण होते. हिंदू हा कोणता धर्म नसून भारताबद्दल बोलताना विशेषण म्हणून त्याचा वापर होतो. ज्यांना हिंदू शब्दावर आक्षेप आहे, ते हिंदवी शब्दाचा वापर करतात. भारतात राहणारा मग तो कोणत्याही धर्माचा, प्रांतातील किंवा समुदायाचा असो बाहेरच्या देशात त्याची ओळख हिंदू म्हणून होते, असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, झारखंडमध्ये पाच दिवसांच्या दौऱ्यावर आले असता ते बोलत होते.
राष्ट्रवाद या शब्दाला चांगले मानले जात नाही
आताच्या काळात राष्ट्रवाद या शब्दाला चांगले समजले जात नाही. या शब्दाला पर्यायी म्हणून 'नॅशनल किंवा नॅशनलिस्ट' हे शब्द योग्य समजले जात आहेत. राष्ट्रवाद या शब्दाचा अर्थ हिटलर आणि नाझीवादाशी जोडण्यात आला आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा - माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल; अनेक धक्कादायक खुलासे
भारताला विश्वगुरू बनवणे जगाची गरज
भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी सर्वात प्रथम भारताला मोठे करण्याची गरज आहे. त्यासाठी हिंदुंना आधी मजबूत करावे लागेल. भारतीय नागरिकांवर एकाच संस्कृतीचा प्रभाव आहे. आपल्या एकतेचे वर्णन हिंदू शब्दाने होते. भारताच्या हितासाठी हा शब्द आहे.
वाईट होण्याची जबाबदारी हिंदुंवर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेची स्थापना भारतातील विविधतेल्या एका धाग्यात बांधण्यासाठी करण्यात आली होती. काही चांगले झाले तर हिंदू शब्दाचा वापर होत नाही. मात्र, काही वाईट झाले की त्याची जबाबदारी हिंदूवर येते, असे भागवत म्हणाले.
हेही वाचा -सरसंघचालक मोहन भागवत तीन दिवस रायगड दौऱ्यावर
हिंदू समाज निर्माण करणे संघाचे लक्ष्य
हिंदू समाज निर्माण करण्याचे काम संघाचे आहे आणि हा उद्देश पूर्ण करण्याचे काम संघ करत आहे. संघ काही फायर ब्रिगेड नाही किंवा स्वयंसेवक ठेकेदार नाहीत. समाज निर्मिती करणे संघाचे काम आहे. त्यासाठी लोकांच्या मनातील भेदभाव काढावा लागेल. आरएसएस १ लाख ३० हजार छोटी मोठी कामे करत आहे. त्यासाठी संघाला कोणतीही सरकारी मदत मिळत नाही.
कट्टरपंथी मोठा प्रश्न
भारताला विश्वगुरू करण्याची गरज आहे. नागरिक कट्टरपंथी समस्येला घेऊन जगत आहेत. माझेच खरे अशी भावना लोकांमध्ये बळावत आहे. सर्व समस्यांची सुरुवात ही भावना आहे. ही देशाची सर्वात जुनी समस्या आहे, तिला दूर करायला हवे, असे ते म्हणाले.
हेही वाचा -'सीएए ला विरोध करणं चुकीचं', कायदा का आणला हे समजून घ्यावं'