नवी दिल्ली - राज्यसभेच्या व्यवस्थापकांच्या गणवेशात बदल करून, त्यांना नवे गणवेश देण्यात आले होते. हे नवे गणवेश अगदी लष्करी गणवेशाप्रमाणे असल्यामुळे त्यावर काही सदस्यांनी आक्षेप व्यक्त केला होता. त्यानंतर, आज (मंगळवार) राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी नवीन गणवेशाबाबत पुनर्विचार करण्याचे आदेश दिले.
राज्यसभेचे ऐतिहासिक २५०वे अधिवेशन काल (सोमवार) सुरु झाले. त्यानिमित्ताने या व्यवस्थापकांच्या गणवेशात बदल करण्यात आला होता. ज्यानुसार, आधी भारतीय कुडता आणि फेटा अशा पेहरावात दिसणारे व्यवस्थापक हे लष्करी पेहरावात दिसून आले. लष्करी गणवेशासोबतच, त्यांना लष्करी टोपीही देण्यात आली होती. देशाच्या नौदलाच्या गणवेशाशी मिळता-जुळता हा पेहराव होता.
राज्यसभेच्या सचिवांनी काही सूचना आणि संकल्पना लक्षात घेऊनच हा नवा गणवेश निश्चित केला होता. मात्र, आता यावर काही सदस्य आणि काही प्रतिष्ठित व्यक्तीदेखील आक्षेप घेत आहेत, त्यामुळे सचिवांना याबाबत पुनर्विचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे मत नायडू यांनी व्यक्त केले.
हेही वाचा : कर्नाटक पोटनिवडणूक : १२८ अपक्षांसह २४८ उमेदवार रिंगणात