नवी दिल्ली - राहुल गांधी यांच्या अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयाचे प्रियांका गांधींनी समर्थन केल्यानंतर आता रॉबर्ट वाड्रा यांनी राहुल यांची स्तुती केली आहे.

राहुल गांधींसारखे धाडस फार कमी लोक दाखवतात, असे प्रियांका यांनी ट्विटरवर म्हटले होते. तर आज रॉबर्ट वाड्रा यांनी फेसबूकवर पोस्ट लिहत राहुल यांच्या कामाची स्तुती केली आहे.
'राहुल यांच्याकडून मला खुप काही शिकायला मिळाले आहे. देशात 65 टक्के युवक हे राहुल यांच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवतात. राहुल हे साहसी आणि दृढ संकल्प असणारे व्यक्ती आहेत. लोकांची सेवा करण्यासाठी अध्यक्षपदाची गरज नसते हे राहुल यांनी दाखवून दिले आहे. त्यांचा लोकांपर्यंत पोहचून त्यांची सेवा करण्याचा संकल्प कौतुकास्पद आहे. त्याच्या या कामांमधून मला खुप काही शिकायला मिळाले आहे. या संघर्षात मी त्यांच्या सोबत आहे. , असे वाड्रा यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या अनेक मोठया नेत्यांनी त्यांची भेट घेऊन राजीनाम्याच्या निर्णयावरून मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण राहुल गांधी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त ५२ जागा जिंकता आल्या. २०१४ च्या तुलनेत काँग्रेसच्या फक्त आठ जागा वाढल्या आहेत.