कोलकाता - सध्या जगभरात सिंगल यूज प्लास्टिकविरोधी मोहीम सुरू आहे. देशाच्या केंद्रसरकारने घोषित केलेल्या प्लास्टिक बंदीचा पश्चिम बंगालमधील जूट उद्योगाला फायदा होण्याची चिन्हे आहेत. जूट उगवणारे शेतकरी, आणि त्यापासून वस्तू बनवणारे कामगार या सर्वांना आशा आहे, की केंद्राने केलेल्या प्लास्टिकबंदीच्या घोषणेमुळे याआधी बंद पडत चाललेल्या त्यांच्या उद्योगाला पुन्हा चालना मिळेल.
पश्चिम बंगालमधील नादिया आणि नॉर्थ २४ परगणा हे जिल्हे पूर्वीपासून जूट शेतीसाठी ओळखले जातात. या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून, त्यांना अधिक उत्पादन घेण्यासाठी प्रेरित करावे, म्हणून केंद्र सरकारने पश्चिम बंगाल सरकारच्या जूट आयुक्तांना एक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. जूटचे आणि जूटपासून बनवल्या जाणाऱ्या वस्तूंचे उत्पादन वाढवण्यासाठी या अहवालानुसार योग्य त्या उपाययोजना आणि कायद्यामधील सुधारणा करण्यात येणार आहेत.
तसेच, जूटच्या उत्पादनासाठी मुबलक पाणी उपलब्ध करून देणे, आणि जूट बियाण्यांच्या वेगवेगळ्या प्रजातींचे संशोधन करणे याबाबतही या अहवालात माहिती मागवली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने उचललेल्या या पावलांमुळे जूट उत्पादकांना नवी आशा मिळाली आहे. जूटच्या मागणीत आणि उत्पादनातही आता वाढ होण्याची शक्यता ते व्यक्त करत आहेत.
दुसरीकडे, प्लास्टिक उद्योगात असणारे लोक सरकारला विनंती करत आहेत, की प्लास्टिकवरील बंदी तातडीने अंमलात न आणता, टप्प्याटप्प्याने आणावी. त्यामुळे याचा सुवर्णमध्य गाठण्यासाठी प्लास्टिकचा वापर हळूहळू कमी करत, पर्यायी विघटनशील पदार्थांचा वापर वाढवणे हाच सर्वात चांगला पर्याय ठरेल.
हेही वाचा : नो टू सिंगल यूज प्लास्टिक : चक्क प्लास्टिकपासून तयार केल्या विटा