दिल्ली - वायूसेनाप्रमुख बी. एस. धनोआ यांच्या निवासस्थानाबाहेर राफेल लढाऊ विमानाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. विशेष म्हणजे काँग्रेस मुख्यालयाच्या बाजूलाच धनोआ यांचे निवासस्थान आहे. त्यामुळे सरकारने काँग्रेस मुख्यालयाजवळ राफेलची प्रतीकृती उभारून सरकारला डिवचले तर नाही ना? असा प्रश्न उपस्थीत होत आहे.
राफेल प्रकरणावरून काँग्रेसने मोदी सरकारवर अनेक आरोप केले होते. राफेल व्यवहारात भ्रष्टाचार करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्योगपती अनिल अंबानीला मदत केल्याचाही आरोप काँग्रेसने केला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीवर या मुद्द्यांचा काहीही प्रभाव पडला नाही. उलट मोदींचे सरकार अधिक मताधिक्क्याने निवडून आले.
काँग्रेसचा राफेल मुद्दा निवडणूक प्रचारात अपयशी ठरला आहे. मोदींनी या विषयावर एकही पत्रकार परिषद घेतली नाही. या मुद्द्यावरून सरकारला फटका बसेल असा अंदाज होता. मात्र, याउलट परिस्थिती निकालानंतर दिसून आली. काँग्रेसने राफेल मुद्द्यावरून सरकारला घेरले होते. मात्र, आता सरकारने राफेलची प्रतिकृती काँग्रेसच्या मुख्यालयाबाजूला असलेल्या वायूसेना प्रमुखांच्या निवासस्थानात उभारून काँग्रेसला डिवचले आहे.