चेन्नई : लहान मुलांचे प्रसिद्ध नियतकालीक 'चांदोबा' (चंदामामा) मधील चित्रकार के. सी. शिवशंकर उर्फ 'चंदामामा शंकर' यांचे मंगळवारी निधन झाले. तामिळनाडूतील तिरुपुरमध्ये आपल्या घरी त्यांनी वयाच्या ९६व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
चांदोबा मासिकामधील विक्रम-वेताळच्या कथांमधील विक्रम आणि वेताळ या पात्रांना रेखाटणारे कलाकार म्हणजेच शिवशंकर. चांदोबा मासिकाच्या मूळ डिझाईन टीममधील ते अखेरचे जिवंत सदस्य होते. विक्रम-वेताळचे आयकॉनिक चित्र त्यांनी १९६०मध्ये रेखाटले होते. ते चित्र आणि खाली त्यांची सही हे चांदोबा वाचणाऱ्या सर्वांच्याच कायम स्मरणात राहील.
शंकर यांचा जन्म तामिळनाडूमधील एरोड जवळील एका गावात झाला होता. त्यांचे वडील तेथील एका शाळेत शिक्षक होते, आणि त्यांची आई गृहिणी होती.
बी. नागी रेड्डी आणि चक्रपाणी यांनी चंदामामा या मासिकाची सुरुवात केली होती. सुरुवातीला हे मासिक तेलुगुमधून प्रकाशित होत. १९४७ला या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला होता. २०१३साली हे मासिक बंद करण्यात आले.
हेही वाचा : आशिया खंडातील सर्वात वयोवृद्ध हत्ती 'बिजुली प्रसाद'...