जयपूर - पाकिस्तान बॉलिवूडच्या माध्यमातून भारतात अमली पदार्थांचे जाळे (नेटवर्क) पसरवत असल्याचा आरोप उत्तर प्रदेशातल्या गोरखपूर मतदारसंघाचे खासदार आणि चित्रपट अभिनेते रवी किशन यांनी केला आहे. राजस्थानातील कोटा येथे आले असता माध्यमांशी बोलत असताना त्यांनी हा आरोप केला. अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर अमली पदार्थांचा मुद्दा देशभर गाजत आहे. चित्रपट क्षेत्रातील अनेक व्यक्तींची पोलिसांकडून आणि अमली पदार्थविरोधी पथकाकडून कसून चौकशी सुरू आहे.
"ज्या पद्धतीने जैविक अस्त्रांचा वापर करत, चीनने कोरोनाचा जगभर प्रसार केला. तसेच पाकिस्तान बॉलिवूडच्या माध्यमातून भारतात अमली पदार्थांचे जाळे पसरवत आहे. हे अमली पदार्थ नेपाळ, राजस्थान आणि पंजाबमार्गे भारतात आणले जात आहेत, हे सर्व अमली पदार्थ रासायनिक पदार्थांच्या रुपात आहेत", असेही ते म्हणाले.
"पाकिस्तानने खूप मोठे षङयंत्र आखले आहे. कारण, भारतात युवकांची संख्या सर्वात जास्त आहे. त्यांना चुकीच्या मार्गावर नेण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न सुरू आहे. भारताला आणि देशातील युवकांना नुकसान पोहचविण्यासाठी पाकिस्तानचा हा डाव आहे. पाकिस्तान कोकेन आणि इतर अनेक प्रकारच्या नशेच्या पदार्थांची भारतात तस्करी करत आहे. हे अमली पदार्थ गोळ्या किंवा द्रव स्वरुपात आहेत. अमली पदार्थांचा प्रसार करणे त्यांना बॉलिवूडमधून सोपे झाले आहे, कारण लोक चित्रपट पाहून प्रभावित होतात, आणि त्याचे अनुकरण केले जाते", असे ते म्हणाले.
"मी आवाज उठवल्यानंतर अमली पदार्थविरोधी विभागाने कारवाई केली. भारत सरकारची सगळी यंत्रणा कामाल लागली असून अनेक गोष्टी समोर येत आहेत. कोण माल पुरवत आहे? ड्रग्ज पेडलर कोण आहेत? बॉलिवूडमध्येही काही चुकीच्या व्यक्ती आहेत. त्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्याचा विषय सुरू आहे. अमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय जाळ्याला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे, असे ते म्हणाले.