नवी दिल्ली - 'आदित्य ठाकरे पुरेसे सक्षम मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत. आदित्य यांना मुख्यमंत्री करावे, या मागणीसाठी शिवसेना अडून बसली आहे. त्यांनी महाराष्ट्रात भाजपव्यतिरिक्त अन्य पक्षासोबत आघाडी करून सरकार स्थापन करण्याचा प्रय्तन केला तरी आदित्य मुख्यमंत्री बनण्यास पुरेसे सक्षम नाहीत,' असे रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
'आदित्य ठाकरे महाराष्ट्रातील चांगले युवा नेते आहेत. ते शिवसेनेचेही चांगले नेते आहेत. ते बाळासाहेब ठाकरेंचे नातू आणि पक्षाध्यक्ष उद्धव यांचे पुत्र म्हणूनही सक्षम आहेत. मात्र, ते मुख्यमंत्री बनण्यास अद्याप योग्य नाहीत. तरीही, शिवसेनेने इतर पक्षांसोबत सरकार स्थापन केल्यास ते बाळासाहेबांच्या विचारांच्या विरुद्ध ठरेल,' असे आठवले म्हणाले.
राज्यातील सत्ता स्थापनेचा संघर्ष संपवून सरकार बनवण्यासाठी प्रयत्नांविषयी विचारले असता आठवले यांनी शक्य ते सर्व प्रयत्न आपण करत असल्याचे सांगितले. तसेच, भाजप-शिवसेनेने एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याची आशा आपल्याला आशा असल्याचे ते म्हणाले.
'भाजप शिवसेनेला महत्त्वाच्या खात्यांपैकी निम्मी खाती देण्यास तयार आहे, याचाही त्यांनी विचार करावा. तसेच, आदित्य ठाकरेंना ते उपमुख्यमंत्रीपद पाचही वर्षे देण्यास तयार आहेत,' असे आठवले पुढे म्हणाले. 'यामुळे आदित्य यांना मुख्यमंत्रीपदासाठी आवश्यक असलेला अनुभवही मिळेल,' असे आठवले म्हणाले.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर १४ दिवस उलटूनही अद्याप सरकार स्थापन झालेले नाही. या दोन पक्षांमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू आहे.