नवी दिल्ली - केंद्र सरकारने वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या आज(शुक्रवार) बदल्या जाहीर केल्या आहेत. वरिष्ठ अधिकारी राजेश भूषण यांची आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बिहार केडरच्या अधिकारी प्रिती सुदान यांची जागा आता राजेश भूषण घेणार आहेत. सुदान यांना तीन महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली होती, ती 31 जुलैला संपत आहे.
देशावर कोेरोनाचे संकट असताना आरोग्य मंत्रालयात राजेश भूषण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच मध्यप्रदेश केडरचे वरिष्ठ आयएएस अधिकारी अजय तिरकेय यांची नियुक्ती डिपार्टमेंट ऑफ लँड रिसोर्सेसमध्ये करण्यात आली आहे. तिरकेय रुलखुमेलिन बुहरील यांची जागा घेणार आहेत. बुहरील हे 31 जुलैला निवृत्त होणार आहेत.
खाण विभागाचे सचिव सुशिल कु्मार यांची नियुक्ती आता राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाच्या सचिवपदी करण्यात आली आहे. कुमार हे 1987 च्या आयएएस बॅचचे असून त्रिपूरा केडरमधील आहेत. राम कुमार मिश्रा यांच्या जागी सुशिल कुमार यांची नियुक्ती झाली. तर मिश्रा यांची नियुक्ती महिला आणि बालकल्याण खात्यात सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.