नवी दिल्ली - भाजप आपले सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केला आहे. त्यातच, पक्षाचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीही रविवारी ट्विट करत पक्षाच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
राजस्थानमधील प्रकरणाचा उल्लेख करत ते म्हणाले, की काँग्रेसच्या मुख्य नेत्यांना कदाचित तबेल्यातील सगळे घोडे पळवून नेल्यावरच जाग येईल. दरम्यान, या सर्व प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या १२ आमदारांना गुरुग्रामच्या आयटीसी ग्रँड भारत हॉटेलमध्ये हलवण्यात आले आहे. तर, गहलोत यांनी आज रात्री पुन्हा काँग्रेस नेत्यांची बैठक बोलावली आहे.
राजस्थानातील अशोक गेहलोत सरकार पाडण्याचा प्रयत्न विरोधक करत असल्याचे प्रकरण राज्यात चांगलेच गाजत आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी शनिवारी रात्री उशीरा आपल्या निवासस्थानी सर्व मंत्र्याची बैठक घेतली होती. सुमारे 2 तास चाललेल्या या बैठकीत राजस्थान सरकारचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट उपस्थित नव्हते. बैठकीच्या माध्यमातून अशोक गहलोत यांनी सरकारवर आपली पकड दाखवायचा प्रयत्न केला. परंतु, सचिन पायलट यांच्या अनुपस्थितीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
हेही वाचा : गहलोत मंत्रिमंडळाची शनिवारी रात्री पार पडली बैठक ; सचिन पायलट अनुपस्थित