नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पक्षीय बैठकीत “चिनी सैन्यानं भारतीय भूभागात घुसखोरी केली नाही.”असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर राहुल गांधी यांनी ट्विट करुन टीका केली आहे. गांधी यांनी ट्विटमध्ये “चिनी हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी भारतीय भूभाग हवाली केला आहे' अशी टीका केली आहे.
तसेच जर ती जमीन चीनची होती”,तर “आमच्या जवानांना का मारण्यात आलं?, त्यांना कुठे मारण्यात आलं?”, असे प्रश्न राहुल गांधी यांनी सरकारला विचारले आहेत. गलवानमध्ये भारतीय सैनिक हुतात्मा झाल्यानंतर राहुल गांधी ट्विटरवरून सातत्याने नरेंद्र मोदी सरकारला प्रश्न विचारत आहेत.
चीनचा हल्ला आधीच नियोजित होता. मात्र, आपलं सरकार झोपलेलं होते, अशी टीका राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीपूर्वी केली होती. भारत आणि चीनच्या सीमेवर झालेल्या झटापटीमध्ये भारतीय लष्कराचे 20 जवान ठार झाले. त्यावर संपूर्ण देशात चीन विरोधात संतापाची लाट पसरली आहे.
गलवान येथे जवान हुतात्मा झाल्यावरुन पंतप्रधान मोदी गप्प का..? लपत का आहात..? बास.. आता खूप झाल! देशात जनतेला उत्तर द्या, नेमक काय झालं लडाखच्या सीमेवर?, चीनने आपल्या भारतीय सैन्यातील जवानांना मारलेच कसे? चीनची हिंमतच कशी होते, भारतीय सीमेत घुसखोरी करुन कब्जा करण्याची?, असे प्रश्न राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विट करुन विचारले होते.