नवी दिल्ली - 'काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी राहणे ही माझ्यासाठी सन्माननीय बाब होती. मी या संधीबद्दल ऋणी आहे आणि माझे या संघटनेवर नितांत प्रेम आहे. मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून २०१९ मधील लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारतो. जे घडले ते पक्षाच्या वाढीसाठी चिंताजनक आहे. या कारणाने मी अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे,' अशा स्वरूपाचे पत्र लिहीत राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पत्रकारांशी बोलताना आता आपण काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी नसल्याचे सांगितले आहे.
'मी आता काँग्रेस अध्यक्षपदावर नसून पक्षाच्या कार्यकारी समितीने तातडीने बैठक बोलवून नव्या अध्यक्षाची निवड करावी असे राहुल गांधी यांनी बुधवारी स्पष्ट केले. मी आधीच राजीनामा दिला असून कार्यकारी समितीने नव्या अध्यक्षाची निवड करावी असेही राहुल यांनी सांगितले. राहुल गांधी यांची २०१७ साली काँग्रेस अध्यक्षपदावर निवड झाली होती.
लोकसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन २५ मे रोजीच्या पक्षाच्या बैठकीत त्यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव सादर केला. काँग्रेसच्या कार्यकारी समितीने एकमताने त्यांचा राजीनामा फेटाळला. त्यानंतर काँग्रेसच्या अनेक मोठया नेत्यांची त्यांची भेट घेऊन राजीनाम्याच्या निर्णयावरुन मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण राहुल गांधी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त ५२ जागा जिंकता आल्या. २०१४ च्या तुलनेत काँग्रेसच्या फक्त आठ जागा वाढल्या.