हैदराबाद - देशासह संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या महत्त्वकांक्षी चांद्रयान-२ मोहिमेचे सोमवारी (२२ जुलै) उड्डाण होणार आहे. या मोहिमेद्वारे भारत पुन्हा एकदा इतिहास घडविण्यासाठी सज्ज झाला आहे. ही संपूर्ण मोहीम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी अनेक शास्त्रज्ञ महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. त्यापैकी एक असलेले आसामचे शास्त्रज्ञ डॉ. जितेंद्र गोस्वामी यांच्याबद्धल जाणून घेऊयात.
चांद्रयान-१ च्या यशानंतर अवघ्या दहाच वर्षांत 'इस्रो' चांद्रयान-२' च्या निमित्ताने दुसऱ्यांदा चंद्रावर पाऊल ठेवणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शास्त्रज्ञांमधील एक असणारे शास्त्रज्ञ डॉ. जितेंद्र गोस्वामी. आसाममधील जोरहाट जिल्ह्यातील बोरभेटा येथील रहिवासी दिवंगत श्रीनाथ गोस्वामी आणि रंभा गोस्वामी यांचे ते पुत्र. १८ नोव्हेंबर १९५० रोजी त्यांचा जन्म झाला. ते सध्या ६८ वर्षाचे आहेत. आसाममधील विधानसभा सभापती हितेन्द्रनाथ गोस्वामी यांचे ते मोठे भाऊ होत.
बोरभेटा पब्लिक स्कूलमधून जितेंद्र यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण सुरु केले. त्यानंतर त्यांनी जोरहाट गव्हर्नमेंट बॉईझ हायर सेकंडरी अॅन्ड मल्टिपर्पज स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी गुवाहाटी विद्यापीठातून एमएससी ही पदवी संपादन केली. त्यानंतर पीएचडी करण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च येथे प्रवेश घेतला. तसेच या काळात त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठात पदवीधर संशोधक म्हणूनही काम केले.
पीएचडीनंतर त्यांनी अनेक संस्थेत संशोधक म्हणून काम केले. सोलार प्रणाली आणि अॅस्ट्रोफिजिक्स हे त्यांच्या संशोधनाचे मुख्य विषय होते. चांद्रयान-१ चे ते मुख्य शास्त्रज्ञ आणि विकासक आहेत. तर सध्या ते चांद्रयान-२ आणि मंगलयान या मोहिमेत सहभागी आहेत.
जोरहाट येथील त्यांच्या निवासस्थानी सध्या त्यांची मावशी बिनू गोस्वामी या राहतात. जितेंद्रच्या यशाबद्धल त्या सांगतात, की जितेंद्र सुरुवातीपासूनच अभ्यासात खूप हुशार होता. अभ्यासाव्यतिरिक्त इतर उपक्रमातही तो सक्रियपणे भाग घेत असत. सध्या त्याने मिळवलेल्या यशावर आम्हांला त्याचा खूप अभिमान आहे.
दुसरीकडे जोरहाट प्लेनेटोरियमचे संचालक डॉ. प्रणबज्योती चुटिया म्हणाले, की चांद्रयान सुरू करणारे भारत हे जगातील चौथा क्रमांकाचा देश आहे.