सिल्चर - सध्या संविधानाचा सन्मान होत नसून संविधान नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशा शब्दांत प्रियांका गांधींनी केंद्र सरकारवर टीका केली. आसामच्या सिल्चरमध्ये काँग्रेस उमेदवार आणि विद्यमान खासदार सुष्मिता देव यांच्या समर्थनार्थ प्रियांका यांनी रोड शो केला.
पंतप्रधान मोदींनी जगभरात दौरे केले मात्र ते आपल्या वाराणसी मतदारसंघात क्वचितच गेले असतील, अशी टीकाही प्रियांका यांनी यावेळी केली. 'आज महामानव बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून देशाचा पाया रचला. संविधानाचा सन्मान करणे, ही प्रत्येक नेत्याची जबाबदारी आहे', असे प्रियांका यावेळी बोलताना म्हणाल्या.
भाजपच्या जाहीरनाम्यात विविध संस्कृती आणि धर्मांसाठी जागा नाही. संविधानाचा आदर केलेला नाही, असेही त्या म्हणाल्या. मोदींनी गेल्या ५ वर्षांत वाराणसीत ५ मिनिटेही वेळ घालवला नसल्याचे आपल्याला तेथील लोकांनी सांगितले असल्याचे प्रियांका म्हणाल्या. यावेळी सुष्मिता यांची तुलना त्यांनी इंदिरा गांधींसोबत केली. मी याठिकाणी सुष्मितासाठी आली असून त्यांच्यामध्ये इंदिराजींसारखे साहस आहे, असेही प्रियांका म्हणाल्या.