लखनौ - पूर्व उत्तर प्रदेश काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधींनी पती रॉबर्ट वाड्रावरील ईडीच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. चौकशी वगैरे होत राहतात मी मात्र माझ्या कामावरच लक्ष केंद्रीत करत असल्याचे त्या म्हणाल्या. रॉबर्ट वाड्रा यांची मंगळवारी ईडीने ८ तास कसून चौकशी केली होती. याचा तुमच्या कामावर काही परिणाम झाला का, या पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना त्या बोलत होत्या.
जमीन खरेदी घोटाळ्यासंबंधी ईडीने जयपूरमध्ये रॉबर्ट वा़ड्रा यांची मंगळवारी ६ तास कडक सुरक्षाव्यवस्थेत चौकशी केली होती. त्यांच्या आई मौरीन वाड्रा यांचीसुद्धा ईडीने चौकशी केली होती. त्यानंतर आजही वाड्रांची चौकशी सुरूच राहणार असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान पक्षकार्यालयात प्रियंका गांधींनी स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत पक्ष आणि संघटनेविषयी कार्यकर्त्यांशी चर्चा झाली. कार्यकर्त्यांकडून आगामी निवडणूक लढवण्यासाठीच्या रणनीतीची चर्चा झाल्याचेही त्या म्हणाल्या. आगामी लोकसभेसाठी उत्तर प्रदेशातून काँग्रेस पूर्ण ताकदीने लढणार आहे. मंगळवारी राहुल गांधी आणि ज्योतिरआदित्य सिंधिया यांच्यासोबत त्यांनी केलेल्या रोडशोला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.