नवी दिल्ली - कोरोनाबाधित रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करून घेतले जात नसल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे अशा खासगी रुग्णालयांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सज्जड दम भरला आहे.
काही रुग्णालये कोरोनाबाधितांना दाखल करू घेत नाहीत, असे आम्हाला समजल्यानंतर रुग्णांना दाखल करून घेण्यासंदर्भात इशारा देण्यात आला आहे. या रुग्णालयात उपलब्ध खाटांमध्येही काळा बाजार केला जात आहे. यामध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांचा हात आहे. असे प्रकार आढळून आल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री केजरीवाल जनतेला संबोधित करताना म्हणाले.
उपलब्ध खाटांचा काळा बाजार होत असल्याने यावर उपाय म्हणून आपण मोबाईल अॅपलिकेशन आणले. त्यामुळे रुग्णालयांमध्ये खाटा व्हेंटिलेटर किती उपलब्ध आहेत, याची माहिती लोकांना मिळते. मात्र, खाटांचा काळा बाजार होत असल्याने आमच्या कार्याला गालबोट लागले जात आहे, असे केजरीवाल म्हणाले.
राजधानी दिल्लीतही दररोज कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आजपर्यंत दिल्लीत कोरोना विषाणूचे एकूण 26 हजार 334 रुग्ण सापडले आहेत.