पणजी - भाजप नको म्हणून लोकांनी काँग्रेसला मतदान केले होते. तरीही भाजप सत्तेसाठी आमदार फोडाफोडी करून गोव्याच्या राजकारणात चुकीचा पायंडा पाडत आहे. त्याचा आम्ही निषेध करतो, असे वक्तव्य गोवा प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी केले आहे. पणजीतील काँग्रेस भवनमध्ये पत्रकार परिषदेचे आयोनन करण्यात आले होते. त्यावेळी कुतिन्हो बोलत होत्या.
यावेळी त्या म्हणाल्या, काँग्रेसचे 10 आमदार भाजपमध्ये गेले त्या सर्वांशी पक्ष कार्यकर्ता म्हणून माझे सलोख्याचे संबंध होते. त्यामुळे बोलताना अवघडल्यासारखे होत आहे. ते मतदारसंघाच्या विकासासाठी पक्षांतर केले असे म्हणत असले तरीही त्यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी पक्षांतर केले आहे. आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केली ही काँग्रेसची चूक नसून त्या आमदारांची वैयक्तिक आहे, असे कुतिन्हो यावेळी म्हणाल्या.
भाजमध्ये गेलेले आमदार निवडणुकीत काँग्रसमुळेच निवडून आले. अपक्ष लढले असते, तर निवडून येऊ शकले नसते. त्यामुळे काँग्रेस संपलेली नाही. काँग्रेस पुन्हा एकदा ' फिनिक्स' प्रमाणे भरारी घेईल याचा पूर्ण विश्वास आहे. निस्वार्थीपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आपले भविष्य घडविण्याची संधी आहे. काँग्रेस नव्याने उभी करण्यासाठी पक्षापासून नाराज होऊन दूर गेलेले, युवा, महिला आणि हितचिंतकांनी पुन्हा एकत्र यावे, असे आवाहनही यावेळी कुतिन्हो यांनी केले.
गोवा प्रदेशाध्यक्ष म्हणून गिरीश चोडणकर यांनी राजीनामा दिलेला आहे. मात्र, अद्याप तो स्वीकारला की नाही हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली काम करणार का ? असे विचारले असता कुतिन्हो म्हणाल्या, पक्ष उभारणीसाठी कोणाच्याही नेतृत्वाखाली काम करण्याची तयारी आहे.