लखनौ - सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली देशातील खोट्या आणि फसवणुकीच्या राजकारणाचा अंत होईल, असे मत व्यक्त करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यसभा सदस्य प्रमोद तिवारी यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस पुन्हा उभारी घेईल असेही तिवारी म्हणाले.
शनिवारी सोनिया गांधींची काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी निवड झाली. त्यावर प्रतिक्रिया देताना तिवारी बोलत होते. सोनिया गांधींच्या निवडीचे तिवारी यांनी स्वागत केले. काँग्रेसच्या भविष्याबाबत अनेक लोक चिंतेत आहेत, मात्र, सोनिया गांधी यांच्यामध्ये पक्षाला उभारी देण्याची ताकद आहे. सगळे दिवस सारखेच नसतात, असेही तिवारी म्हणाले.
१९९८ मध्येही पक्षाची अशीच अवस्था झाली होती. त्यावेळी सीताराम केसरी यांच्या जागी सोनिया गांधींची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर सोनिया गांधीच्या नेतृत्वात काँग्रेसने पुन्हा उभारी घेतल्याचे तिवारी म्हणाले. सोनिया गांधींच्या नेतृत्वात देशात जे फसवणुकीचे राजकारण चालले आहे, त्याचा अंत होईल, असेही तिवारी म्हणाले.