पाटणा - बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान २८ ऑक्टोबरला होणार आहे. या टप्प्यात राज्यातील काही युवा नेत्यांचे राजकीय भविष्य दावणीला लागले आहे. एकूण ७१ जागेवर पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. यावेळी राज्यातील मतदार युवा नेत्यांच्या राजकीय भविष्याचा फैसला करणार आहेत.
दिवंगत केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंह व माजी खासदार पुतुल सिंह यांची मुलगी श्रेयसी सिंह या भाजपकडून जमुई मतदारसंघातून राजकीय आखाड्यात उतरल्या आहेत. त्यांना आई-वडिलांकडून राजकीय वारसा मिळाला आहे. परंतु त्यांनी आतापर्यंत आपले नाव खेळाच्या मैदानात गाजविले आहे. त्या एक नामांकित आंतरराष्ट्रीय नेमबाज आहेत.
पहिल्या टप्प्यातील मतदान होणाऱ्या मतदार संघात कहलगांव आणि सुल्तानगंज याचा समावेश आहे. या मतदार संघातून काँग्रेसचे दोन तरुण नेते मैदानात आहे. कहलगावमधून काँग्रेसचे दिग्गज नेते सदानंद सिंह यांचे पुत्र शुभानंद मुकेश तर सुल्तानगंजमधून युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष युवा नेते ललन यादव हे मैदानात आहेत. ललन यांची सुल्तानगंजमध्ये चांगली पकड असून तेथे जातीय समीकरण ही त्यांच्या बाजुने असल्याचे दिसत आहे.
तारापूर विधानसभा मतदार संघातून तरुण चेहरा दिव्या प्रकाश यांचे भविष्य मतदार ठरविणार आहेत. दिव्या प्रकाश खासदार जयप्रकाश यादव यांची मुलगी आहे. दिव्या प्रकाश यांचे वय फक्त २८ वर्ष असून त्या सर्वात तरुण उमेदवार आहेत. तारापूर मतदार संघातून राजदच्या त्या उमेदवार आहेत. तरुण वर्ग त्यांना मतदान करणार असून त्या तरुणांचे विधानसभेत प्रतिनिधत्व करणार आहेत.