कांकेर (छत्तीसगढ) - उत्तर बस्तर भागातील नक्षलवाद्यांना साहित्य पुरविणाऱ्या शहरी भागातील सुत्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ५ शहरी नक्षलवाद्यांना अटक केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील तरुणांचा समावेश आहे. या प्रकरणी अनेक मोठी नाव समोर येऊ शकतात, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तसेच हे आरोपी देशाच्या अन्य भागातील सक्रीय नक्षल्यांच्या संपर्कात असू शकतात, असाही अंदाज पोलिसांना आहे.
२४ मार्चला पोलिसांनी सिकसोड परिसरातून एक वाहन जप्त केले. वाहनासोबत पकडलेल्या आरोपीची चौकशी करताना तो नक्षलवाद्यांना सामान पुरवायला जात असल्याचे उघड झाले. या वाहनात ४५ जोड जोडे, नक्षल्यांची वर्दी, वॉकी-टॉकी इलेक्ट्रिकल वायर आणि इतर साहित्य जप्त केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक एमआर अहिरे यांनी एक स्पेशल टीम तयार केली होती. चौकशीदरम्यान आरोपीने दिलेल्या जबाबाच्या आधारावर अजय जैन, कोमल प्रसाद, रोहीत नाग, सुशिल शर्मा आणि सुरेश शरणागत यांना अटक केली आहे. हे सर्व आरोपी नक्षल्यापर्यंत रोख रक्कम आणि सामान पोहचवण्याचे काम करत होते. आरोपींकडून २ वाहनेदेखील जप्त केली आहेत.
अटक केलेले आरोपी ठेकेदारीचे काम करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपींनी लेंडमार्क इंजीनियर कम्पनी आणि रॉयल इंजीनियर कंपनीच्या नावाने जिल्ह्यातील रस्तेनिर्मितीचे काम घेतले होते. आरोपी ज्या कंपनीचा कंत्राट घेऊन काम करत होते, त्या कंपनीच्या संचालकावरदेखील संशय आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. या आरोपींनी एकदा ५ लाख, एकदा अडीच लाखांची रोख रक्कम नक्षल्यांपर्यंत पोहचवल्याचे समोर आले आहे. हे आरोपी उत्तर बस्तरमधील मोठ्या नक्षल्यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे. नक्षली नेता राजू सलाम आणि राजेश यांच्यासोबद आरोपींचे थेट संबंध होते, हेदेखील उघड झाले आहे.